Advertisement

एक पत्र तुझ्यासाठी

 एक पत्र तुझ्यासाठी

  आजी तू सोडून गेलीस           

  अनपेक्षितपणे न सांगता,

म्हणून हे एक पत्र तुझ्यासाठी

देवाघरी वाच मी धाडता....


खूप काही राहून गेलं गं

मनात माझ्या सलतंय ,

तुझ्यासाठी शब्दांचं 

तसंच जपलंय वलंय....


आठवणीने हुंदक्यांना

अश्रु सावरून नेतात,

कुणी पाहू नये म्हणून

पदराआडूनच वाहतात....


आजी कसं सांगू गं तुला

तुझ्या ऋणातून व्हायचं उतराई 

सेवा करून खूप सारी

व्हायचं होतं तुझी आई...


नाही दिलीस संधी अशी

बाईपणानं मी ही बांधलेली,

पारतंत्र्याच्या हिशोबात

कितीदा देवाशी भांडलेली..


आठवून सारं काही मन

आतल्याआत आक्रंदतं,

तुझ्या त्या स्मृतींनी सहजच

काळीज माझं पाझरतं.....


राहून गेलं खूप काही 

तू जवळ असतानाचं,

माझंच मन सतत टोचतं

नवल वाटून प्राक्तनाचं....


ह्रदयाचा एक कप्पा 

तुझ्याचसाठी मी जपलाय,

तुझ्यासोबतच देवाकडे

जन्म पुढचा मागितलाय.....


कशी आहेस तू ते

मी आल्यावर समजेलंच,

काळजी घे देवाचीही इतकी

आजी काय त्यालाही उमजेलंच


माझ्या आठवणीत रडू नको

देवासोबत भांडू नकोस,

खुशाल नांद देवाघरी

या चिमणीला विसरू नकोस...


माणसं असतात जवळ तोवर

सुखाची ओंजळ भरभरून द्या,

फिरून त्यांचे येणे नाही कधीच

मन भरून सहवास द्या.....


श्रीम.जया वि.घुगे-मुंडे

परळी वैजनाथ,बीड

Post a Comment

0 Comments