Advertisement

मागे वळून पाहताना...


मागे वळून पाहताना...

सायंकाळी साडेचार-पाच ची वेळ होती. सुट्टीचा दिवस होता म्हणून दुपारच्या जेवणानंतर छोटीशी वामकुक्षी घेऊन ताजातवाना झालो होतो. नुकतीच पावसाची एक सर पडून गेली होती. व्हरांड्यात खर्ची टाकुन बसलो होतो, पंधरा वीस मिनिटे गेली असावीत वातावरणाच्या त्या खेळात रमलो होता. कारण नुकताच एका पावसाच्या सरिनंतर पुन्हा ऊन पडल होत. तो आजूबाजवा खेळ काही वेगळाच होता. म्हणजे "धो-धो पाऊसही नव्हता आणि कडक ऊनही नव्हत... मनाची स्थिती सुध्दा काहीशी तशीच असावी... त्या क्षणाला ते मन स्थिरही नव्हतं आणि अत्यंत चंचलही नव्हतं... सभोवतालच्या आसमंतामध्ये कदाचित विरून गेल होत...
थोड्या वेळाने "ए मम्मे...मम्मे..." अशी एका मूलाची हाक माझ्या कानी पडली. पाहिलं की एक छोट मूल त्याच्या आईला हाक मारत होतं. त्याची आई डोक्यावर एक भली मोठी लाकडाची मोळी घेऊन निघाली होती. घाई-गडबडीत खूप मोठ्या वजनाची मोळी घेऊन भरभर पावलं टाकत ती चालली होती. त्याच्या मूलानं तीला आतापर्यंत तीनचार वेळा हाक मारली होती पण ती मागे पाहत नव्हती.
आणि पाहणार तरि कशी? आणि किती वेळा? इतकं वजन जे डोक्यावर होत... आपल्या मुलाच्या हाकेला 'मागे वळून पाहताना' सुध्दा तिची गरिबी तिच्या आड येत होती. तिच्या घरात 'आई' ची 'मम्मी' झाली होती मात्र चुलीची 'शेगडी' झाली नव्हती. त्या क्षणाला तिला 'मागे वळून पाहता'  येत नव्हतं पण भविष्यकाळात जेंव्हा ती "मागे वळून पाहिल" तेव्हा जरी भूतकाळात गरिबी दिसत असली तरि पोराचं भवितव्य तिला उज्वल करायचं होतं... 
एकदा मी माझ्या परिवारासोबत देवस्थानाच्या ठिकाणी गेलो होतो तेथे पोहोचल्यानंतर बाबा म्हणाले. " अरेच्च्या ...इकडे तर खूप काही बदल झाले आहेत..." अमुक येथे चिंचेची झाडे होती, तो रस्ता कच्चा होता, पलिकडच्या बाजुला मोठा पाणवठा होता, मंदिराची एक बाजू खूप जुनी झालीय वगैरे वगैरे... म्हणजे बाबा जेंव्हा 'मागे वळून पाहत' होते तेंव्हा त्यांना खुप वेगळे चित्र दिसत होत... त्या छोट्याशा सहलीवरुन परतल्यानंतर बाबा जेव्हा मला म्हणाले "मागे वळून पहा... गाडीमध्ये काही राहील का?" मी पून्हा त्या रिकाम्या गाडीचा जेंव्हा दरवाजा उघडला तेव्हा, छोट्या भावंडांनी खाल्लेली वेफर्सची पाकीट, चिरमुरे, आईसक्रीमचा कागद इतकच दिसलं... मी म्हणालो "काहीच राहीलेलं नाहीये..." मात्र तेथे खूप काही होत... ताई - दादासोबत म्हटलेली ती नविन गाणी, बाबांनी एका जून्या सिनेमातला म्हटलेला तो डायलॉग, छोट्या भावाने त्याच्या शाळेतील म्हटलेलं ते बडबडगीत, गाण्याच्या तालावर गाडीमध्ये केलेला डान्स... खुप साऱ्या आठवणी तेथे होत्या...
जेंव्हा मुलीच्या लग्नानंतर संपूर्ण सोहळा आटोपल्यानंतर त्या मुलीचा भाऊ वडीलांना म्हणतो "बाबा, कार्यालयाच्या खोलीत काही राहीलं का..? मागे वळून पहा ना...” तेंव्हा बाप मागे वळून पाहील्यानंतर भले ही म्हणेल "काहीच नाही" मात्र तेथे खुप काही असेल... लहान असताना याच चिमूडीने गॅदरिंगमध्ये भाग घेतला होता तेव्हा त्याच्या बापाने हौसेने गजरा आणला होता. आज त्या कार्यालयाच्या खोलीत त्याचा मुलीच्या  गजऱ्यातील फुलांच्या पाकळ्या तेथे पडलेल्या दिसल्या. बापाला क्षणात तो वीस-पंचवीस वर्षांचा खेळ, मुलगी लहानाची मोठी झाली तो काळ डोळ्यासमोरून जाईल...
एखादे गणित सोडवताना जेंव्हा चार पानं 'मागे वळून पहावं' लागतं तेव्हा जर त्या पहिल्याच गणितामध्ये खाडाखोड असेल तर पूढचं गणित सोडवणं कठीण जातं... शिक्षक वर्गामध्ये आल्यानंतर "मागच्या तासाला काय झालेल आहे...?" असा प्रश्न करतात तेव्हा अगोदरच्या तासाला जागे असला तर पूढचं सगळं कळेल... शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेंव्हा अचानक एके दिवशी मित्राचा फोन येतो की, "अरे यार, गेट टूगेदरचं प्लॅनिंग अाहे ये पटकन" तेंव्हा मागे वळून पाहताना खुप साऱ्या आठवणींचा खजिना भेटतो...
मला असं वाटतं की, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा प्रसंग येतो की त्या वेळेस त्याला 'मागे वळून पहाव लागतं' आता प्रत्येकाच्या आयुष्यात असा प्रसंग येणारच असेल तर मग आता आपण जो क्षण जगतो आहोत हा क्षण कसा सजवता येईल हे पहायला नको का? मग आत्ताच्या क्षणाला सजवावं कसं..? कारण आत्ताचा क्षणच जर समजून-उमजून आनंदात घालवला तर आणि तरच तो क्षण पून्हा स्मरणात अाल्यानंतर आनंद देईल म्हणजे आत्ताच्या क्षणासाठी असा विचार करणे गरजेचे आहे की, माझं आत्ताच जगण सुंदर आहे का? आत्ताच जगणं पवित्र आहे का? आनंदी आहे का? भलेही आत्ताचा क्षण कष्टाचा असेल... परिश्रमाचा असेल... प्रथमतः कष्ट आणि परिश्रम म्हणजे दुःख ही व्याख्या मनातून काढायला हवी कारण कदाचित आत्ताच्या कष्टामध्ये उद्याचा आनंद सामावला असेल. चांगल्या वर्तनातून, कृतीतून घालवलेला आत्ताचा क्षण भविष्यात खूप महत्त्वाचा ठरेल प्रत्येक व्यक्तीजवळ एक ना एक अशी ताकद असते, अशी शक्ती असते की त्याचा प्रयोग योग्य रितीने केला तर जगत असलेला क्षण सजवला जाऊ शकतो... कोणाकडे विनोदबुध्दी असू शकते तर कोणाकडे छानसा हजरजबाबीपणा, अशा पध्दतीने कलात्मक रितीने प्रत्येक क्षण अानंदात घालवला तर "मागे वळून पाहताना" नक्कीच आपल्या चेहऱ्यावर स्मितहास्य असेल.
यशस्वी झाल्यानंतर प्रत्येकजण पूढील वाटचालीस, पूढील भविष्यासाठी, पूढील प्रगतीसाठी अामच्या खूप साऱ्या शुभेच्छा असंच म्हणतो... मात्र त्या भविष्यासाठी आत्ताच्या  काय करायचं हे ज्याचं त्यालाच ठरवायचं भाहे.

>>"आठवण...हसवणारी...रडवणारी... जगवणारी"<<
आणखी एक मागे वळून पाहण्याचा दुसरा मनसुबा तो असा..
 म्हणजे मी जसा होतो तसा आता आहे का? काही गोष्टींमध्ये बदल झालाय का? हा बदल महत्वाचा आहे का? काही गोष्टींमध्ये मी जसा होतो तसाच आता असणं गरजेचं आहे तसा मी आहे का? एक गोष्ट मात्र आहे बर का, बदल हा काळाप्रमाणे होताच जाणार आणि बदल हा झालाच पाहिजे. बदल होणार म्हणजे होणार हे अंतिम सत्य आहे. आपण फक्त हे पडताळून पहायचं आहे की हा बदल माणुसकीला धरून आहे का? या बदलणे सामाजिक भान राखले आहे का? जास्त गंभीर होण्याची गरज नाही हो..!! अरे लहानपणी असं नाक गळायच की अगदी "त्याची" मजल वरच्या ओठांपर्यंत यायची. आता तस नाही ना होत.. हा बदल चांगलाच आहे ना??
   आठवणी या केवळ सध्याचा वेळ घालवण्यासाठी किंवा भूतकाळात रममाण होण्यासाठी नसाव्यात. काहीवेळा या आठवणींमध्ये वर्तमानात जगताना आवश्यक असणारी प्रेरणा व  भविष्यासाठी उत्साह देण्याचं सामर्थ्य असतं. म्हणजे बऱ्याच कालावधीपासून मी जे काम करतोय त्या कामामध्ये मी निपुण झालोय का? किंवा अगोदर च्या काळामध्ये मी ज्या चांगल्या गोष्टी करत होतो त्या गोष्टी मी सातत्याने आता करतोय का? माझ्या स्वभाव गुणांमध्ये जे अमुलाग्र बदल झालेले आहेत ते योग्य आहेत का? हे सुद्धा आपण पडताळून पाहू शकतो. आणि कदाचित याच गोष्टीला आत्मनिरीक्षण म्हणतात.आता हे आत्मनिरीक्षण करताना तुलनात्मक अभ्यास हा होणारच पण काळजी ही घ्यावी की होणारी तुलना कोणा दुसऱ्या व्यक्तीसोबत नसावी. कारण काहीवेळा अशावेळी समोरच्या व्यक्तीच पारडं जड झाल तर अपमान, लोभ किंवा मत्सर या गोष्टी विनाकारण आपल डोकं वर काढतात.
    मित्रहो काहीवेळा अशी गोष्ट घडते की सध्याच्या व्यापामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये, कामामध्ये इतके गुरफटून जातो की मी हे सगळ का करतोय? माझ ध्येय काय होत? कोणत्या कालावधीनंतर मला थांबायचं आहे? मला कोणत्या अंतिम स्थानी पोहोचायच आहे? याचा विसर पडू लागतो. अशा वेळी आपण भूतकाळात ठरवलेले निर्धार, आपण ठरवलेले अंतिम ध्येय याची आठवण पुन्हा नव्याने विचार करायला शिकवते. कदाचित घरी वरिष्ठ लोक जे  म्हणायचे की " मी काय सांगतो ते आठवण ठेव म्हणजे झालं" त्याच्या मागे असाच काहीसा उद्देश असावा.
 आणि शेवटी ते आहेच हो... दीपिका बाईंनी 'ये जवानी है दिवानी' मध्ये म्हटलंच आहे... "यादे मिठाई की डीब्बेकी तरह होती है... एकबार खुला तो....!"

Post a Comment

0 Comments