Advertisement

पोट वाढलेल्या प्रकारातील दुसरा व्यक्ती म्हणाला म्हणाला..म्हटल आज थोड दुःख लिहू.. वहि घेतली, पेन घेतला.. लिहायला सुरुवात केली तर प्रश्न पडला काय लिहायचं??
काय आहे दुःख? का आहे दुःख? कोणाला आहे दुःख? आणि केव्हा पर्यंत आहे दुःख? शब्द सूचेना.. काय लिहावं..? विचार आला की दुःखच वर्णन करायचं की अनुभव व्यक्त करायचं? दुःख कसं असतं? त्याचा रंग कोणता? त्याच रुप काय असतं? 
              थोड्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करू. आता इतका चांगला खोल विचार करण्यासारखा विषय मिळाला आहे आणि शब्द सुद्धा सुचत नाहीत मग मी नाराज झालो.. याला दुःख म्हणतात का? नाही.. याला शाब्दिक विवंचना असं म्हणू शकतो. काल कात्रीने कागद कापत असताना कात्री हाताला लागली, थोड रक्त सुद्धा आले.. डोळ्यातून पाणी आले.. मग याला दुःख म्हणतात का? ना.. छे हो... ती एक शारीरिक दुखापत होती... मध्यंतरी एका मित्राचा फोन यायचा की त्याच्या मैत्रिणीची त्याला खूप आठवण येत होती..दोघांचा ब्रेकअप झाल्यापासून त्याला भूक लागत नाहीये..झोप लागत नाहीये.. डोळ्यातून अश्रू सुद्धा येताहेत.. कदाचित हे दुःख असावं..?? नाही हो.. मला वाटतं तो आप्त/स्नेही जणांचा विरह असावा.. बाबांनी प्रॉमिस केलं होत की या वेळी माझ्यासाठी आयफोन नक्की.. पण काही कारणांमुळे नाही मिळाला मग मन पुन्हा नाराज झाल.. हे दुःख आहे का? अरे नाही... ही तर त्या वस्तूसाठी असलेली आसक्ती झाली...
      आपण एक निरीक्षण नक्की करु शकतो बर का.. की या ज्या घटना होत्या आणि त्या घटना घडत होत्या त्या क्षणाला त्या घटना म्हणजे दुःख आणि केवळ दुःख च आहेत असा आपल्याला भास होतो.. अरे भास नाही.. आपण शंभर टक्के विश्वास ठेवतो की हेच दुःख आहे.. आणि यालाच दुःख म्हणतात... आपली विचासरणी अशी असते की "अरे... एक साधी मोबाईल सारखी छोटी वस्तू आपल्याला मिळू शकत नाही हे दुःख नव्हे का??"
         एक गमतीदार ओळ वाचनात आली होती... "हे बघ मित्रा, जगात सर्वत्र दुःख आहे ... काही लोक पोटाला मिळत नाही म्हणून दुखी आहेत, तर काही लोक मिळवून वाढलेल्या पोटामुळे दुःखी आहेत..." मला या ओळीच्या खोलवर उतरायचं आहे... पाहू तरि कीती आहे या ओळीची खोली...!
ज्यांच्या पोटाला काहीच मिळत नाही, किंवा खूप कमी मिळत आणि आर्थिक परिस्थीती हालाखिची आहे अशी दोन उदाहरणे मला मिळाली. एकाची गाथा अशी होती की, "कदाचीत माझं गेल्या जन्माचं पाप असाव की, मी या कुटूंबात जन्माला आलो... काम केल्यानंतर मोजकेच पैसे हाताला मिळतात, पोटाची खळगी भरली जात नाही, वरुन महागाईचा बोजा... देवाने मलाच का दुःख दिलेल आहे...?" आणि दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊन मी चकीतच झालो... त्याच घर सुद्धा अगोदरच्या व्यक्तिसारख मातीचं आणि शेणानं सारवलेलच होत.. मला म्हणाला की, "अरे रोजच घरातल्या फरशीवर किंवा मऊ खुर्चीत बसत असशील.. या शेणानं सारवलेल्या जमिनीवर बसून बघ...  थंड वाटेल, स्वर्गाची अनुभूती येईल..." आणि त्याने आपुलकीने जर्मन धातूच्या आणि वजनाने अगदीच हलक्या पेल्यातुन पाणी प्यायला दिल... (पाणी अगोदरच्या व्यक्तीकडे सुद्धा होत पण त्यापेक्षा त्याच्या दुःखाच्या धबधब्याला पाणी जास्त होत..) तो पुढे म्हणाला, "माझ्या मागच्या जन्माचं पुण्य असाव की, या कुटूबात मी जन्माला आलो... पैसा नाही, संपत्ती नाही मात्र एकच भाकरी आम्ही तिघे मिळून खाताना, का माहीती नाही... पण आम्हा तीघांच पोट भरत..." सांगण्याचा भावार्थ हा होता की, आजूबाजूला प्रसंग असताना सुद्धा त्याने स्वतःहून दुःखाला कवटाळून मिठी मारली नव्हती..
          आता दुसरं उदाहरण पोट वाढलेल्यांच... एकटा म्हणाला की. "अरे यार... मला दिवसभर ऑफिसमध्ये लोक टोमणा मारतात... एवढं मोठं पोट घेऊन नको वाटत ऑफिसला जायला...!" पोट वाढलेल्या प्रकारातील दुसरा व्यक्ती म्हणाला म्हणाला "अरे खुळा आहे का तू...? असा का विचार करतोय माझा छोटा मुलगा माझ्या पोटावर बसून किती छान खेळतो माहीतीये का...? माझ्या पोटावर बसल की काही क्षणांत रडणं थांबत त्याच.."
         मित्रांनो खर सांगू का? उल्लेख केलेल्या प्रत्येक व्यक्तीला दुःख आहे... हो आहे... अरे मला सांगा, ज्या व्यक्तीसोबत आपल रक्ताच नातं आहे, ती व्यक्ती उपाशी आहे, आपल्या पोटच पोर उपाशी आहे हे पाहून कोण दुःखी होणार नाही? ज्याच्यासोबत आपल्या भावनांची माळ गुंफलेली आहे, ज्यांच्याबद्दल आपूलकीची, मायेची मुळे अशी अंतःकरणात खोलवर रुतलेली आहेत त्यांच्याबद्दल घडलेली प्रत्येक वाईट गोष्ट दूःख देणारीच आहे....जर पैसा, प्रतिष्ठा मिळवून सुद्धा शारिरिकदृष्ट्या आपण कमजोर असू किंवा अति ओबडधोबड असू तर ही सुद्धा एक प्रकारे दुःखाचीच बाब आहे. मुख्य मुद्दा हा आहे की आपण त्या दुःखाला प्रतिसाद कसा देतो... अरे अशी खूपशी उदाहरणे आपल्याला सापडतील की आर्थिकदृष्ट्या कमजोर आहेत पण सुखी आहेत आणि अशी ही उदाहरणे आहेत की आर्थिक बाजू प्रबळ असूनही दुःखी आहेत. आपण हसणार आहोत की रडणार आहोत हे आपल्या हातात असलेला पैसा नाही ठरवत. ते पूर्णतः अगदी शंभर टक्के आपल्यावर अवलबून आहे...
उदाहरण, घटना, प्रसंग आणि प्रसंगानुरूप परिणाम आपल्या समोरच आहेत त्याला काय प्रतिसाद द्यायचा आणि कोणत्या भावनेची उत्पत्ती अंतःकरणात निर्माण करायची हे आपणच ठरवायच...!

Post a Comment

0 Comments