Advertisement

काळजातल्या लेकी


काळजातल्या लेकी
       सौरभ देशमुख एक हसरे व्यक्तिमत्त्व. मनमिळाऊ माणूस.बायको  राधाही तशीच. जोडीस जोड. उणीव एकच... नोकरी नाही. मिळाली, तरी टिकली नाही.पण एक वैशिष्ट्य.... वैशिष्ट्य काय, वरदानच म्हणा ना! हाताला चव अशी, की साक्षात अन्नपूर्णा प्रसन्न.चव, अंदाज, यांचं बेजोड गणित. नवे नवे पदार्थ करून खाऊ घालायचा छंदच जणू. आमटी फोडणीला घातली तर पातेलं भर भात संपलाच पाहिजे.याचा हाच गुण जिवलग मित्रानं हेरला.
"अरे सोड त्या नोकरीचा नाद आणि जेवणाच्या ऑर्डर्स घे. पैज लाव, लाखात खेळशील"
"कुठे रे, आपलं छोटसं गाव, कोण देणार मला ऑर्डर?" 
"अरे माणसं बदलली आता, सगळं रेडिमेड लागतं. चल, सुरुवात माझ्यापासून. येत्या पौर्णिमेला सत्य नारायण घालतोय. जवळची 20-25 माणसं आहेत. स्वयंपाकाचं तू बघ." सौरभने राधा कडे पाहिलं, तिच्या डोळ्यात आशा दिसली.
     सत्य नारायण साग्रसंगीत झाला. स्वयंपाकाची वाहवा झाली. एवढ्यात कोणी बडी आसामी वाट काढत येताना दिसली. सौरभ ला स्वतः ची ओळख करून देत म्हणाले, 
"नमस्कार, मी शरद पाटील. शहरात छोटासा उद्योग आहे माझा. तुमच्या हाताला काय चव आहे हो, एकदम आईची आठवण झाली."मनापासून बोलत होते हे जाणवत होतं. सौरभच्या चेहऱ्यावर स्मित झळकले.
"पुढच्या आठवड्यात लग्नाचा वाढदिवस आहे बघा. पन्नासेक माणसं बोलावलीत. पण जेवणाची ऑर्डर तुम्हीच घेतली पाहिजे."
"अहो पण , माझा हा पहिलाच अनुभव.शिवाय साहित्य, माणसं, काहीच नाही माझ्याकडे."
"त्याची चिंता तुम्ही नका करू. तुम्ही फक्त काय किती घालायचं तेवढं बघा." आता नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. श्रीगणेशा जोरदार झाला. इथंही ओळख निर्माण झाली, नव्या ऑर्डर्स मिळाल्या. साखळी सुरू झाली. आजूबाजूच्या गावांतही कार्य प्रसंग असला की तुम्हीच पाहिजे हा आग्रह जोर धरू लागला. नव्याने गावं शहरे जोडणाऱ्या रस्त्यांनी मदतच केली होती. 
      मग दोघांनीही ठरवलं, आता वाढवायचं, माणसं मदतीला घ्यायची, गावातल्या लोकांनाच सामील करून घ्यायचं. कष्टाळू, कामसू माणसं हेरली. नवा टेम्पो घेतला. रहीम चाचा चा फिरोज ड्रायव्हर म्हणून नेमला. जोशी गुरुजींचा मुलगा आता आवडीनं पौरोहित्य शिकला. मेरी चं पार्लर नववधू ला सजवू लागलं, पिंकी ने काढलेल्या मेंदीत मुलींची स्वप्न रंगू लागली. शांता मावशी ची रमा सुंदर रांगोळ्या घालायची. तिलाही सामील करून घेतलं. बंटीच्या सनई चौघड्यावर अख्खे वऱ्हाड डोलू लागलं. गावदेवी च्या जत्रेतच बरकत पाहणारे अण्णा फुलवाले आता लग्नाचे डेकोरेशन करू लागले. किराणा हवा तर महेश भाईचाच. सगळी टीमच  मरगळ झटकून कामीलागली. थोडयाफार कुरबुरी झाल्या, तरी फायद्याचा विचार करून समेट घडवू लागले. छोटीशी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच तयार झाली. सौरभ आणि राधा देशमुख आता सर्वांचे मामा मामी झाले.
" नाव काय द्यायचं पण आता या कंपनी ला?" राधाने हसत विचारलं.
"घरचं कार्य असं नाव देऊ या. आपण म्हणतो ना, ठरवताना व्यवहार, करताना घरचं कार्य."
सर्वानाच आवडलं नाव. गाडी आता फक्त रुळावरच  आली नव्हती, तर वेगही पकडला होता. खंत एकच होती, 8 वर्षे झाली पण घरच्या डोहाळे जेवणाचा योग अजून आला नव्हता. जोडलेल्या पुण्याईने म्हणा, की सर्वांच्या प्रार्थनेने म्हणा, राधा सौरभ देशमुखांना ते ही भाग्य मिळाले. कन्यालक्ष्मी आली. नाव ठेवलं स्वाती. सर्वांची लाडकी, हुशार स्वाती पाहता पाहता मोठी झाली. दहावी बारावी ला चांगले मार्क घेऊन उत्तीर्ण झाली. आय आय टी मध्ये पोचली सुद्धा. सहज मूठ उघडावी आणि तळहातावर फुलपाखरू बसावं, तशी शिक्षण संपताच, नोकरीही मिळाली. आई वडील लाडक्या लेकीच्या लग्नाचे स्वप्न बघू लागले होते. 
"आई, बाबा, माझ्या लग्नाचं इतक्यात बघू नका, जर्मनी ची ऑफर आली आहे मला. आपल्या घरचं कार्य साठी तिथल्या ऑर्डर्स आणते की नाही बघा." आनंद मनात मावेना असं झालं सगळ्यांचंच. छोट्याशा गावातलं घरचं कार्य आता परदेशाकडे झेपावणार होतं.
     पण उंच जाताना झोक्याची कडी खळकन तुटावी आणि दणकून खाली आपटावे तसंच झालं. स्वाती आज मुंबई च्या ऑफिस मधली कामे उरकून जर्मनी कडे रवाना होणार होती. खरंतर तिला सोडायला जायची दोघांचीही भरून ईच्छा होती, पण तारखा आधीपासून घेतलेल्या होत्या. दिलेला शब्द आणि वेळ पाळणं, उत्तम गुणवत्ता आणि सचोटी हाच तर घरचं कार्य चा पाया होता. त्याप्रमाणे घरचं कार्य चा परिवार कामात गुंतलेला होता. राधा कानात प्राण आणून स्वातीच्या फोनची वाट पाहत होती. विमानतळावर पोचली की ती फोन करणार होती. एवढयात फोन वाजला आणि अधीरतेने एका रिंग मध्येच तिने उचलला. 
"अग स्वाती, काय हे, कधीची वाट पाहतेय मी तुझ्या फोनची."
           पण समोर जे काही कळलं, ते ऐकल्यावर असं वाटलं, हजार भुंगे एकाच वेळी कानाला चावताहेत. जे काही ऐकलं ते मेंदूत शिरलंच नाही, मनाने स्वीकारलंच नाही.  भोवळ येऊन खाली पडतानाच समोर च्या हेमा भाभी ने धावत येऊन धरले. काहीतरी भयंकर घडलं हे कळायला वेळ लागला नाही. फोन सुरूच होता, हेमा भाभीनी फोन घेऊन नेमकं काय झालं, कसं झालं ते विचारलं. स्वातीचा अपघात होऊन  जागीच सगळं संपलं होतं. अविश्वसनीय वाटावी अशी खरी घटना घडली होती.
     सर्वांच्या सुख दुःखात धावणाऱ्या राधा सौरभ साठी गाव धावून आलं .स्वातीचे दिवसकार्य पार पडले, जग रहाटी सुरू झाली. पण पोटची पोर गमावलेल्या आई बापा साठी जग गोठून गेलं होतं. जिची पाठवणी करायची, तिला खांदा द्यायची वेळ वैऱ्यावरही ना येवो. कोलमडून पडलं होतं विश्व. सावरणे शक्य नव्हतं. चार दाणे टिपायला एकत्र आलेली माणसं वाट पाहून उडून गेली. त्यांनाही पोट होतं. सुकू लागलेल्या झाडावर पाखरं सुद्धा घरटी बांधत नाहीत. दुःख सर्वांना होतं पण नाईलाज होता. या अभागी जीवांसाठी काहीतरी करावे असं गावाला वाटत होतं पण नेमकं काय , कोणाला कळत नव्हतं.
      दिवसा मागून दिवस सरले, महिने गेले. काळ कोणासाठी थांबत नाही. गाव तसं सामाजिक बांधिलकी  जपणार  होतं. काही वर्षांपूर्वी आजू बाजू च्या शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या होत्या. त्यांची मुलं आता मोठी झाली होती. मुली लग्नाला आल्या होत्या. संसाराचा गाडा विधवा आयांनी लेकरांकडे पाहून कसाबसा ओढला होता. पण लेकीचं लग्न म्हणजे सत्वपरिक्षाच !  गावाने एकत्र येऊन अशा मुलींचा सामूहिक विवाह घडवून आणायचं  ठरवलं.  जवळपासच्या गावोगावी निरोप गेले. बरचसे समदुःखी. पाहता पाहता काही लग्ने ठरली सुद्धा. जो तो आपल्या परीने मदत करू लागला. राजकारणी मंडळी च्या कानावर गेलं तसं त्यांनीही संधी साधून भरपूर मदत केली. जाहिरातही केली. कोणाची हरकत असण्याचं कारणही नव्हतं. कार्य पार पडतंय याचं समाधान होतं. मुलींचा संसार सुरू करायला थोडे पैसे, धान्य, भांडीकुंडी द्यावी आणि लग्न सोहळा साधे पणाने पार पाडावा असं ठरलं.
      जेवणाचा मेनूही साधा सुटसुटीत म्हणजे मसालेभात, जिलब्या आणि मठ्ठा असा ठरला. "मसालेभात बनवावा तर देशमुख मामांनीच " "आणि जिलब्या फक्त मामींच्याच हातच्या" कोणीतरी नकळत बोललं पण सगळे गंभीर झाला. "अरे कशाला त्यांच्या जखमेवरची खपली काढता, काम सोडलं ना आता त्यांनी" रामुकाका बोलले. पण मनोजच्या डोक्यात काही निराळंच सुरू होतं. "जखमेचा निचरा ही होऊ द्यावा लागतो कधी कधी" पण हे वाक्य तो मनातच बोलला आणि तिथून निघाला. 
   "मामा, नाही म्हणू नका, धंद्याचे काम असतं तर तुम्हाला बोललोच नसतो बघा पण पुण्याचं काम आहे. "मनोजने काळजाला हात घातला होता. नाही म्हणता आलंच नाही. ठरल्या प्रमाणे देशमुख मामा मामी भच्यांसाठी मांडवात दाखल झाले, तेही काळजावर दगड ठेवूनच. नववधू च्या वेशात अनेक मुली उभ्या होत्या. आपलीही लेक अशी नटून थटून मांडवात उभी असती... दोघांचेही डोळे पाणावले. एवढयात त्यातलीच एक पुढे आली. "आशीर्वाद द्या मामा," म्हणत पाया पडली. अरे, ही तर  बाली,  रमेशची लेक. 

रमेश , सौरभ चा वर्गमित्र. शाळेच्या वाटेवरच त्याचं शेत. हरभरा तरारला की घेऊन जायचा शेतात. शेकोटी पेटवून त्यावरच हरभऱ्याचे फोक भाजायचा, गरम गरम हातावर चोळून खायला द्यायचा. "सोऱ्या, हे वावर जिंदगी हाय आपली" असं राजाच्या थाटात  तो म्हणायचा. दोस्तीची हिरवळ जपणारा रमेश एकदा भेटला तेव्हा तडा पडलेल्या जमिनी सारखा दिसत होता. नापिकीने वैतागला होता. " अरे, भाजीपाला पिकव, घरचं कार्य चा कोणताच स्वयंपाक तुझ्या भाजीशिवाय होणार नाही , शब्द देतो मी"
" जमीन कर्जात बुडाली", एवढंच म्हणाला भरल्या गळ्याने.  ती शेवट ची भेटच ठरली. समोर बाली उभी होती, तिच्या डोक्यावर हात ठेवून भरल्या डोळ्यानेच आशीर्वाद दिला. पालथ्या मुठीने डोळ्यातलं पाणी पुसलं. चटकन मागे वळून तांदूळ धुवायला घेतले. "कांदे बटाटे चिरलेत का, मसाला आणा, राधा जिलब्या घेतल्यास का तळायला?" 
तुपात तळून पाकात , घोळून नव्या नवरी सारख्या जिलब्या अलगदपणे परातीत जाऊन बसत होत्या. रामू काकांनी घरच्या म्हशींच दूध दिलं होतं, त्याचं दही लावून मठ्ठा घोटणं सुरू झालं होतं. मसाले भातासाठी चूल पेटली. घमघमाट दरवळू लागला. राधा सौरभ दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. आता ही चूल पेटती ठेवायची पोटच्या लेकीसाठी नाही पेटवता आली, तरी काळजातल्या लेकींसाठी ....

Post a Comment

0 Comments