Advertisement

अंदाज आरशाचा, वाटे, खरा असावा


अंदाज आरशाचा, वाटे, खरा असावा
बहुतेक माणसाचा, तो चेहरा असावा

जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा

नाही अखेर कळले, नौका कशी बुडाली
भयभीत काठ सांगे, तो भोवरा असावा

का आळ खंजिरावर, घेता तुम्ही खुनाचा?
की वाटले तुम्हाला, तो सोयरा असावा!

काठावरी उतरली, स्वप्ने तहानलेली
डोळ्यात वेदनेचा, माझ्या, झरा असावा

भेटून वादळाला, इतुके विचार आता
शाबूत एवढाही, का, कोपरा असावा

दारात ती उभी अन्‌, नयनी अबोल अश्रू
लाचार ती असावी, तो, उंबरा असावा

माथ्यावरी नभाचे, ओझे सदा "अलाही'
दाही दिशा कशाच्या, हा, पिंजरा असावा

कवी- इलाही जमादार

Post a Comment

0 Comments